श्रीनिवास नागेइस्लामपूर (सांगली) : माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे. त्यामुळे एसटी बस चालवून देशाचा अमृतमहोत्सव साजरा करणे गुन्हा असेल, चुकीचे असेल तर सरकारने खुशाल कारवाई करावी, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.सोमवार, दि.१५ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालय परिसरात सजून आलेल्या इस्लामपूर आगाराच्या विठाई बसचे सारथ्य जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू साखर कारखाना रस्त्यावर त्यांनी ही बस चालविली. त्याची समाजमाध्यमावर मोठी चर्चा झाली. मात्र काल, बुधवारी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या कृतीवर नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचा आक्षेप नोंदवत थेट पोलिसांना निवेदन देत आमदार जयंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली.भाजपच्या निवेदनात एसटी महामंडळात त्यांची नियुक्ती आहे का? त्यांच्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिला जाणारा बॅच-बिल्ला आहे का? अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आमदार पाटील यांनी सार्वजनिक वापरातील वाहन चालवून रस्त्यावरील पादचारी आणि इतर वाहनांना धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आक्षेप ठेवण्यात आला होता. त्यातच आता राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आल्याने कार्यकर्त्यांनीही गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला होता.या सर्व पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. माझ्याकडे परवाना आहे. तसेच बस चालवून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद घेतला यात चुकीचे काय आहे? असा प्रतिसवाल करत बस चालविणे हा गुन्हा असेल तर सरकारने कारवाई करावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
..तर खुशाल गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 2:45 PM