अंकलखोप : मध्यंतरी माझ्या साहित्य चोरीची मोठी चर्चा करण्यात आली. मी साहित्य चोरी केल्याचे सिद्ध झाले, तर लेखणी बंद करेन, असे स्पष्टीकरण ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी शनिवारी दिले. औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाने आयोजित केलेल्या ७४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.विश्वास पाटील म्हणाले की, साहित्यिकाच्या जीवनामध्ये ठिणगी पडते व साहित्याचा वणवा निर्माण होतो, तेव्हाच ते साहित्य दर्जेदार होऊन त्याला लोकमान्यता मिळते. लेखक हा कलावंत असतो. तो व्रतस्थ असतो. सध्या मात्र लेखकांमध्ये मरगळ आली आहे. एखादी कादंबरी प्रसिद्ध झाली की लेखक थांबत असल्याचे दिसत आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्राला थोर साहित्यिकांची परंपरा आहे. ही माती कसदार आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. साहित्यामध्ये विदर्भाचा दिसणारा अनुशेष पश्चिम महाराष्ट्राने भरून काढला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी वेगवेगळे विषय साहित्यात आणले पाहिजेत. अलीकडे ग्रामीण भागातील नागरिकीकरणाला वेगवेगळे रंग आहेत, त्याची उधळण साहित्यिकांनी करावी. ‘पानिपत’मध्ये मी माणसे शोधली, म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली. ‘पानिपत’ हा शब्द ‘पुण्यपत’ झाला, कारण मी पानिपतच्या मुळापर्यंत गेलो. अभ्यास केला. नवीन लेखकांनी मेहनत घेतली पाहिजे. देश फिरला आणि पाहिला पाहिजे, तरच कसदार साहित्य निर्मिती होईल. मध्यंतरी माझ्या साहित्य चोरीची मोठी चर्चा झाली. मात्र मी साहित्य चोरी केल्याचे सिद्ध झाले, तर त्याचक्षणी लेखणी बंद करेन, असेही पाटील यांनी सांगितले.प्रारंभी दिवंगत सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. कवी सुधांशू पुरस्कार राजेंद्र टिळे (शिराळा), ओंकार चिटणीस (बोरगाव-इस्लामपूर) यांना, तर कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार शहानवाज मुल्ला (इस्लामपूर) व प्रा. विठ्ठल सदामते (रामानंदनगर-पलूस) यांच्या काव्यसंग्रहांना देण्यात आला. डॉक्टरेट पदवी मिळविलेल्या प्रा. डॉ. महेश पाटील (भिलवडी), प्रा. डॉ. शार्दूल जोशी (औदुंबर), डॉ. दिनार पाटील (अंकलखोप), प्रा. डॉ. सोनम सूर्यवंशी (अंकलखोप) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोहन दत्तात्रय आवटे (आमणापूर) यांच्या ‘खुन्नस’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. पुरुषोत्तम जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सरपंच संजना यादव, उपसरपंच विजय पाटील, साहित्यिक वसंत केशव पाटील, प्रा. प्रदीप पाटील, बाळासाहेब पवार (कुंडल), बापूसाहेब शिरगावकर, अशोक पाटील (नागठाणे), उदयसिंह सूर्यवंशी, वैशाली पाटील, रघुराज मेटकरी आदी प्रमुख उपस्थित होते. वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ‘सैराट’चा काव्यात्मक भाग बघासध्याच्या परिस्थितीबद्दल विश्वास पाटील म्हणाले की, समाजाने ‘सैराट’सारखी कलाकृती पाहावी, मात्र सैराट होऊ नये. त्या चित्रपटातील प्रसंगांसारखे तरुणांनी धाडस करू नये. त्यातील काव्यात्मक भाग आत्मसात करावा. जाती-पातीच्या, धर्माच्या नावावर लेकीचा घातपात करण्याची वाईट प्रवृत्ती घालवण्याचे आवाहन मी साहित्यिक म्हणून करतो. ‘पानिपत’कार म्हणतात...मी शब्दाच्या फडातील पाटील आहे. तमाशा, कुस्ती व उसाच्या फडातील नाही!औदुंबरच्या साहित्य संमेलनातून मराठीची सांस्कृतिक पायाभरणीपानिपत बनले मराठ्यांमुळे ‘पुण्यपत’!
साहित्य चोरी सिद्ध झाल्यास लेखणी थांबवू
By admin | Published: January 15, 2017 1:12 AM