राष्ट्रवादीने प्रस्ताव दिल्यास सांगली महापालिकेत आघाडी: विश्वजित कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:39 PM2017-11-02T23:39:08+5:302017-11-02T23:41:56+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी असून, पालिकेतही काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे.
सांगली : महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी असून, पालिकेतही काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्ताव दिला तर, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीबाबत विचार करू, असे स्पष्टीकरण युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले. आघाडीचा निर्णय काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांशी विचारविमर्श करूनच घेतला जाईल. हा निर्णय कोणत्याही स्थितीत लादला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रदेश काँग्रेसच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी सांगलीत जनआक्रोश यात्रेची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संजय मेंढे, संतोष पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीबाबत विचारता, ते म्हणाले की, राज्यातील सांगली, नांदेड, अमरावतीसह सहा महापालिकांत काँग्रेसची सत्ता आहे. सांगलीत तर काँग्रेस बहुमतात आणि राष्ट्रवादीचे आमच्याहून निम्मे सदस्य आहेत.
दोन्ही सेक्युलर विचारसरणीचे पक्ष आहेत. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढणे योग्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगली नव्हे, राज्यपातळीवरही एकत्र यावे, ही जनतेची इच्छा आहे. पण सांगली महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने प्रस्ताव द्यावा, त्याबाबत विचार करू, अशी भूमिका मांडली. आघडीचा निर्णय हा स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवकांना विचारात घेऊनच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
भाजपने हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय जनतेवर लादला. त्यानंतर जीएसटी लागू करून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले. देशाचा जीडीपी घसरला असून, बेरोजगारीत वाढ झाली आहे. राज्य शासनाची कर्जमाफीही फसवी आहे. त्याविरोधात ८ नोव्हेंबरला राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यातही जनआक्रोश मेळावा होणार आहे. त्याची जिल्ह्यात बैठकांद्वारे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. येथील नेमिनाथनगरातील मैदानावर हा मेळावा होणार असून, सुमारे लाखहून अधिक लोक सहभागी होतील, असा दावा केला.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारला होता. तसा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधता डॉ. कदम म्हणाले की, पलूस-कडेगावमध्ये राष्ट्रवादी-भाजप आघाडी कशी होते? याचे उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी द्यावे. सांगलीतच नव्हे, पुण्यातही दोन्ही पक्ष एकत्र आले असते, तर तेथे भाजपला थारा मिळाला नसता. तरीही दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा राज्यातील निर्णय वरिष्ठ नेते घेतील. सांगलीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.
महापौर-आयुक्त : समेट घडवू
महापौर-आयुक्त संघर्षाबाबत कदम म्हणाले की, महापालिका निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली आहे. त्यादृष्टीने आमचे लक्ष आहेच. पदाधिकारी, नगरसेवकांशी चर्चा सुरू आहे. काही कामांना विलंब होत असल्याबद्दल जनतेत नाराजी आहे. यातून आयुक्तांबाबत बेबनाव झाला आहे. यासाठी महापौर व आयुक्तांशी डॉ. पतंगराव कदम यांनी चर्चा केली होती. आयुक्तांचे काम चांगले आहे. पण अवधी कमी असल्याने कामाला गती देणे आवश्यक आहे. लवकरच त्यासाठी महापौर, गटनेते, आयुक्तांना एकत्र घेऊन स्नेहभोजन घडवून समेट करू.