लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने जिल्ह्यात ३३ हजार ५३८ विद्यार्थी पुढील वर्गात जाणार आहेत. बारावीतून सुटल्याचे समाधान असले तरी पुढील प्रवेशासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.
शासनाने बारावी परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार हे स्पष्ट केलेले नाही. गतवर्षीच्या अकरावीच्या गुणानुसार मूल्यांकन करायचे, तर गतवर्षी ही परीक्षादेखील झालेली नव्हती. त्यामुळे मूल्यांकनासाठी कोणता पॅटर्न निश्चित करणार याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांना आहे. जिल्ह्यात ३३ हजार ५३८ विद्यार्थ्यांसाठी ४९ केंद्रांवर परीक्षेची तयारी केली होती. ऑफलाईन नसली तरी किमान ऑनलाईन परीक्षेचा अंदाज शिक्षक व विद्यार्थ्यांना होता. पण सीबीएसईने परीक्षा रद्दचा निर्णय घेताच राज्य शासनदेखील याच मार्गावरुन जाणार हे स्पष्ट झाले होते. परीक्षा रद्द करण्याविषयी शिक्षणतज्ज्ञ व पालकांत विरोधाची भावना आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झालेच पाहिजे, असा सूर आहे.
दहावीनंतर फार मोठ्या संख्येने विविध शिक्षणक्रमांच्या वाटा नाहीत. बारावीनंतर मात्र शिक्षण आणि करिअरच्या वाटा निश्चित होतात. या स्थितीत मूल्यांकन पारदर्शी होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा, गुणवंत विद्यार्थी स्पर्धेत मागे पडण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
मुलांची संख्या १९,५६०
मुलींची संख्या १३,९७८
एकूण परीक्षार्थी ३३,५३८
बॉक्स
बारावीनंतरच्या संधी
- बारावीनंतर कला, वाणिज्य व शास्त्र हे पारंपरिक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. एमपीएससी व युपीएससीच्या स्पर्धा परीक्षांसाठी पाया म्हणून हे शिक्षणक्रम प्राधान्याचे ठरतील.
- बारावीनंतर अभियांत्रिकी पदविका व पदवीचा मार्ग उपलब्ध आहे. त्याशिवाय एमबीबीएससाठी प्रवेश परीक्षा देऊन डॉक्टरकीच्या विश्वातही प्रवेश करता येईल.
- हवाई अभियांत्रिकी, नौदल, सैनिकी अधिकारी या पदांच्या शिक्षणक्रमांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे तयारी करता येते. विज्ञान शाखेतूनही संशोधन क्षेत्रात अनेक शाखा खुल्या झाल्या आहेत.
- सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये करिअरसाठी बारावीनंतर वाटा खुल्या होतात. परदेशी शिक्षण व नोकरी करु इच्छिणाऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतात.
शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...
परीक्षा रद्द झाली तरी पुढील प्रवेशासाठी सीईटी व्हायलाच हवी. त्यासाठी अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम निर्धारित करता येईल. सीईटीचे वेळापत्रकही लवकर जाहीर करायला हवे. परीक्षा रद्द झाली असली तरी ती होऊ शकते याची सूचना विद्यार्थ्यांना दिली होती, त्यामुळे त्यांनी अभ्यास कायम ठेवला होता. त्याचा फायदा आता सीईटीसाठी होईल.
प्रा. भास्कर ताह्मणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली
शासनाने सीईटी लवकर घ्यायला हवी. तसे झाले तरच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करता येईल. शैक्षणिक वर्षही लवकर सुरु होईल. बारावीची परीक्षा रद्द झाली तरी मूल्यांकन पारदर्शी झाले पाहिजे. पारंपरिक शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय ऐच्छिक ठेवता येईल.
- प्रा. अमोल विभुते, शासकीय महिला तंत्रनिकेतन, तासगाव
विद्यार्थी म्हणतात...
बारावीनंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणार आहे. परीक्षा रद्द झाली असली तरी अभ्यास जोमाने सुरुच ठेवला होता. आता वैद्यकीय शिक्षणक्रमाची सीईटी परीक्षा पारदर्शी तसेच ऑफलाईन झाली पाहिजे. तरच प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. सीईटी जाहीर करण्यापूर्वी अभ्यासासाठी पुरेसा वेळही द्यायला हवा.
- काजल नरळे, विद्यार्थिनी, सांगली
परीक्षा रद्दचा निर्णय घेऊन शासनाने विद्यार्थ्यांवरील ताण कमी केला आहे. आता मूल्यांकनाचा पॅटर्न लवकर निश्चित केला पाहिजे. पारंपरिक बीए, बीकॉम, बीएस्सी प्रवेशासाठी सीईटी ऐच्छिक हवी.
- प्रतीक चव्हाण, विद्यार्थी, मिरज
पालक म्हणतात...
परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकनात काय निकष लावणार हे शासनाने स्पष्ट करायला हवे. इंजिनिअरिंग व मेडिकलची सीईटी ऑफलाईनच घेतली पाहिजे. परीक्षेवर भविष्यातही संकट येऊ शकते हे लक्षात घेऊन कायमस्वरुपी मार्ग काढण्याचा प्रयत्न शासन व शिक्षणतज्ज्ञांनी करावा.
- विनायक अवसरे, पालक, सांगली
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कोरोनामुळे स्वागतार्हच आहे. पण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी झाली पाहिजे. गेली सव्वा वर्ष ऑनलाईनमुळे शिक्षणावर पुरेसे लक्ष केंद्रित झालेले नाही. आता पुढील वर्षासाठी तर चांगल्या शिक्षणासाठी मार्ग काढायला हवा.
- नीलेश व्हनमाने, पालक, मिरज