सांगली : शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा पवित्र शिक्षक संघर्ष समितीने दिला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानाला पाठींबा दिला असून पोर्टल सुरुच ठेवण्याची मागणी केली आहे.शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगलीतील अधिवेशनात केसरकर यांनी पोर्टल बंद केले जाणार नाही अशी ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे संस्थाचालक आणि सरकार आमनेसामने आले आहेत. पवित्र शिक्षक संघर्ष समितीने केसरकरांना पाठींबा जाहीर करताना म्हंटले आहे की, शिक्षक भरतीवेळी संस्थाचालक लाखो रुपये वसूल करतात. नोकरीसाठी अनेक तरुण दागदागिने आणि शेतीवाडी विकून पैशांची जमवाजमव करतात. गुणवत्ता असूनही पैशांअभावी नोकरीपासून वंचित रहावे लागत होते. शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरती सुरु केल्याने संस्थाचालकांच्या मिळकतीला चाप बसला आहे. त्यामुळेच ते अस्वस्थ झाले आहेत. पोर्टल बंद करण्याची मागणी करत आहेत.पण सरकारने संस्थाचालकांच्या दबावाला बळी पडू नये. भरती पोर्टलद्वारेच करावी. यातून दर्जेदार शिक्षक मिळतील व शिक्षणाची गुणवत्ता वाढेल. पोर्टल बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास भावी शिक्षक पेटून उठतील, रस्त्यावर येतील. केसरकरांनी ठाम भूमिका घेतल्याने त्यांचा सत्कार करणार असल्याचे पवित्र शिक्षक संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष प्रा. अर्जुन सूरपल्ली यांनी सांगितले.
आमची वयोमर्यादा संपण्यापूर्वी शासनाने दुसरी अभियोग्यता परीक्षा घेऊन पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करावी. हजारो उमेदवार पोर्टलकडे डोळे लावून आहेत. - स्नेहा कदम, उमेदवार
महाराष्ट्रातील कित्येक शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. शासनाने पवित्र पोर्टल सुरुच ठेवून भरती करावी. - मारुती भोईटे, उमेदवारकेसरकर यांनी घोषणेनुसार ३० हजार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत करावी. पोर्टल बंद केल्यास हजारो पात्र तरुण पैशांअभावी नोकरीपासून वंचित राहतील. - प्रतिभा मगदूम, महिला आघाडी अध्यक्षा, पवित्र शिक्षक संघर्ष समिती