सचिन लाड - सांगली , विभागाने प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतल्याने जिल्ह्यात गरोदर मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. तरीही सध्या हे प्रमाण एक लाख गरोदर मातांमागे ६९ आहे. जिल्ह्यात दरवर्षी ३० गरोदर मातांचा मृत्यू होतो, तर सरासरी महिन्याला दोन असे मृत्यूचे प्रमाण आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शहरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रबोधनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात २० ते २५ वर्षांपूर्वी १ लाख गरोदर मातांमागे मृत्यूचे प्रमाण ९० इतके होते. आरोग्य विभागाकडून प्रबोधनाचा अभाव, घरीच प्रसूत होणे, कोणतीही काळजी न घेणे ही यामागची प्रमुख कारणे होती; मात्र कालांतराने परिस्थितीत बदल होत गेला. स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसुती रुग्णालयांची संख्या जिल्ह्यात वाढली. शहरी व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयातून प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले. यामुळे प्रमाण घटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी ३० गरोदर मातांचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. मात्र आरोग्य विभागाला यश आलेले नाही.
प्रमाण घटले, तरीही धोका कायम
By admin | Published: July 10, 2014 12:39 AM