सांगली : सध्याच्या काळात प्रबाेधन करणे गुन्हा ठरत आहे. संत तुकाराम विद्रोही संत होते. ते जर आजच्या काळात असते तर समाजाला शहाणे का करता म्हणून लोकांनी त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली असती, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांनी व्यक्त केले.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने रविवारी ‘जगद्गुरू तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार’ने वसंत केशव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सांगलीच्या मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवनमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी ‘संगीतसूर्य केशवराव भोसले गौरव पुरस्कार’ शाहीर बजरंग आंबी, ‘डॉ. रखमाबाई राऊत गौरव पुरस्कार’ डॉ. तन्वी रवीराज शिंदे, ‘डॉ. सरोजिनी बाबर गौरव पुरस्कार’ साहित्यिका मनीषा पाटील, ‘छात्रवीर संभाजीराजे साहित्य गौरव पुरस्कार’ दिवंगत साहित्यिक चारूता सागर यांचे चिरंजीव साहित्यसेवक राजेंद्र भोसले आणि कवी वसंत दादू पाटील यांना प्रदान करण्यात आले.
वसंत केशव पाटील म्हणाले, सांस्कृतिक आणि साहित्यिकदृष्ट्या आपण पंगू बनत चाललो आहोत. ग्रामीण माणसाची दु:खे हा विनोदाचा विषय असू शकत नाही. साहित्यिकांनी ग्रामीण भागाचं अर्थकारण आणि शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन लिहिले पाहिजे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष व्हावा, यासाठी माझ्या काही साहित्यिक मित्रांनी माझ्यावर पुस्तक प्रकाशित केले. परंतु, मला संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे नाही. माझ्या सडेतोड स्वभावामुळे साहित्यक्षेत्रात माझे शत्रूच जास्त आहेत. म्हणूनच माझे साहित्य कोणत्याही विद्यापीठाला नाही.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, अमृत सूर्यवंशी, उद्योजक राजेंद्रसिंह पाटील, जगद्गुरू तुकोबाराय परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, प्रदेश महासचिव बालाजी जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मनीषा पाटील यांनी आभार मानले. मनीषा रायजादे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, अपर्णा खांडेकर, विनायक कदम, उद्योजक सुनील कांबळे, रामराव सुळे, सुधाकर पाटील उपस्थित होते.