सांगली : सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सेतू केंद्रामार्फत अनेक प्रकारचे दाखले दिले जातात. मी ज्यावेळी या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो, त्यावेळी विद्यार्थ्यांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेवून त्यांना लागणारे दाखले दिले जायचे, असे माझ्या निदर्शनास आले होते.मधल्या काळात सातत्याने सेतू केंद्रांची तपासणी करून सेतू केंद्रावर दंडात्मक कारवाई केली. तरीदेखील मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने सांगितले आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे घेतले जातात.
ही बाब निषेधार्ह आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे सेतू केंद्राबाहेर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत, असे सर्व उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना लेखी स्वरूपामध्ये कळविण्यात आले आहे.
सेतू केंद्राच्या बाहेर जर एखाद्या विद्यार्थ्याकडून पैसे घेतले जात असतील, त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी, मात्र कुठल्याही सेतू केंद्राला विहित शुल्कापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. त्यांनी सेतू केंद्राची बारकाईने तपासणी करावी. अशा प्रकारे कोणी पैसे घेत असतील, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.