मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. ताकारी-शेणोली, फुरसुंगी-पुणेदरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या कामाच्या पाहणीसाठी दि. २२ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल येणार आहेत. या दाैऱ्याच्या पूर्व तयारीसाठी शर्मा यांनी मिरज व कोल्हापूर स्थानकात सुरू असलेली विविध कामे व प्रवासी सुविधांची पाहणी केली.
मंगळवारी सकाळी शर्मा यांनी कोल्हापूर स्थानकाची पाहणी केल्यानंतर सकाळी ११ वाजता विशेष रेल्वे मिरज रेल्वे स्थानकात दाखल झाली. स्थानकात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. स्थानकात फलाट क्रमांक १ व ३ वर बसविण्यात येणाऱ्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. रेल्वे यार्ड व मिरज-सांगलीदरम्यान विश्रामबाग स्थानकाजवळ सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी राज्य शासनाने परवानगी दिल्यास पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची तयारी असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.