आटपाडी : महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला टिकवायचे असेल तर आमचेही ऐकून घेतले पाहिजे, म्हणजे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही. अशी आमची महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती असल्याचे सांगत आमदार अनिल बाबर यांनी इशारा दिला आहे.
आटपाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता आमदार अनिल बाबर यांनी शिवसेना पक्षाकडून आम्हाला पाहिजे तितके पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, आम्ही काही मंत्रिपद मागायला आलो नाही, ना सत्ता मागायला आलोय. महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासकामाबाबत आम्हाला त्रास होत आहे. मतदारसंघात विकासकामाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या एका पक्षाकडून त्रास होत असल्याचे सांगत आम्हाला अभिमान आहे, आम्ही तो सोडणार नाही. आम्हाला कोण अहंकार, गर्व आहे, असे म्हणत असेल तरी अहंकारी नाही. मात्र, आम्हाला स्वाभिमान आहे, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही.
चुकलो तर सांगा
आम्ही स्वतंत्र विचाराने राजकारण करतो. आम्ही चुकीचे असलो तर सांगावे. जयंत पाटील यांनीसुद्धा आम्हाला सांगावे. आम्ही चुकत असो तर त्यांनी आम्हाला सांगावं की अनिलभाऊ तुमचं चुकतंय तुम्ही थांबावं. आम्ही निश्चित थांबू. शेवटी आम्ही माणूस आहोत. आमचे चुकत असेल. मात्र, सध्या सुरू असलेला प्रकाराबाबत खंत व्यक्त केली.