अशोक डोंबाळे/सांगली
सांगली : इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी दि. ८ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शब्द पाळवा, अन्यथा दि. १० डिसेंबरला पेठ (ता. वाळवा) येथे पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे.
संदीप राजोबा म्हणाले, राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथे १ डिसेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. मागील गळीत हंगामाला गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला असेल तर त्यांनी प्रतिटन ५० रुपये द्यावेत. तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखानदारांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत. तसेच यावर्षीच्या गळीत हंगामासाठी एकरकमी तीन हजार १०० रुपये दर दिला पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले होते. शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीमध्ये जीवावर उदार होऊन उड्या घेतल्या होत्या. सांगलीचे जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन हे जिल्हाधिकारी यांचा निरोप घेऊन आले होते. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची दि. ८ डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात येणार आहे. आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती अजून कोणतीही हालचाल दिसत नाही. प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपत आहे. जिल्हा प्रशासनाने ऊस दराची कोंडी फोडली नाही तर रविवार, दि. १० रोजी पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.
जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्षजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार दर देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवार, दि. ८ रोजी बैठक साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी कोणता तोडगा काढणार आहेत, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.