सांगली : सत्तेत असतानाही पदाधिकाऱ्यांची स्थानिक पातळीवरील काही कामे होत नसतील तर शिवसेना जिल्ह्यात वाढणार कशी, असा सवाल उपस्थित करीत सांगलीच्याशिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली.
माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाप्रमुख संजय विभूते, उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुजाता इंगळे, रूपेश मोकाशी, प्रसाद रिसवडे, सचिन कांबळे, हेमा कदम, मनीषा पाटील, सुनीता मोरे आदी उपस्थित होते. बैठकीत पक्षवाढीबाबत चर्चा करण्यात आली. गोऱ्हे यांनी पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीबाबत सूचना केल्या. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची गाऱ्हाणी मांडली. शिवसेना सध्या राज्यात सत्तास्थानी असून अनेक महत्त्वाची खातीही पक्षाकडे आहेत. मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडेच आहे. अशा परिस्थितीत सांगलीत प्रत्येक तालुक्यात व शहरात पक्ष वाढायचा असेल तर त्या ठिकाणची लोकांची कामे झाली पाहिजेत. अनेकदा पदाधिकारी शिवसेनेच्या मंत्र्यांना निवेदन देतात, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. स्थानिक पातळीवर ही कामे होऊन पक्षाचे अस्तित्व दिसले पाहिजे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक मंत्री सतत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात. तुलनेने शिवसेना मंत्र्यांचे दौरे होत नाहीत, अशा समस्या मांडल्या.
यावर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या की, स्थानिक पातळीवर लोकांची कामे झालीच पाहिजेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगले लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा पक्षाला होणार. स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामेही व्हायला हवीत, ही भावना योग्य असल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.
मंत्र्यांशीही चर्चा करण्याचे आश्वासन
शिवसेनेचे जे मंत्री भेटतील त्यांच्यापर्यंत सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना पोहचवून त्यांना येथील कामे करण्यासाठी आग्रह करेन, असे आश्वासन गोऱ्हे यांनी दिल्याचे समजते.