शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: समाजमाध्यमात छायाचित्रे यावीत, यासाठी काही नगरसेवक धडपड असतात. पण त्यांनी महापालिकेत जनतेची कामे करण्यासाठी येतात, याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दात आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी महासभेत नगरसेवकांचे कान टोचले. महापालिकेत नगरसेवक विवेक कांबळे व योगंद्र थोरात यांच्यात झालेला वादानंतर आयुक्तांनी सदस्यांना फैलावर घेतले. महापालिकेत जनतेच्या कामासाठी येतो, याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे. दुसऱ्या दिवशी माध्यमात प्रसिध्दी मिळवण्यासाठी होणारे प्रकार चुकीचे आहेत. नगरसेवकांची मुदत १९ ऑगस्टला संपणार असली तरी त्यांनी विकासकामांची यादी द्यावी. मुदत संपल्यानंतरही त्यांच्या कामाला प्राधान्य देऊ. महापालिकेचे उत्पन्न २५० ते ३०० कोटी आहे. शासनाच्या निधीतील मंजूर कामाच्या हिस्स्याचे जवळपास ७० ते ८० कोटी देणी आहेत. कुपवाड ड्रेनेज योजनेपोटी ८० कोटीची तरतूद करावी लागणार आहे. एलबीटीच्या अनुदानात दोन ते तीन कोटी रुपये घालून कर्मचाऱ्यांचे पगार केला जात आहेत. पण देणी वाढल्याने भविष्यात पगारही वेळेवर करता येणार नाहीत. त्यामुळे आता उत्पन्न वाढीशिवाय पर्याय नाही. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने नगरसेवकांना अडचण नको म्हणून करवाढ, दरवाढ केली नाही. पण निवडणूकीनंतर पहिल्याच वर्षी उत्पन्न वाढीबाबत कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे.
काहींना सांभाळले, काहीपासून सांभाळून राहिलो
काही ठराविक नगरसेवकांची कामे अधिकारी करतात, या आरोपावर केला जातो. अनुभवी नगरसेवक फायली मंजूर करून घेतात. त्यांची कामे होतात. प्रशासनातील अधिकारी त्यांना सहकार्य करतात. कारण अधिकाऱ्यांनाही काही नगरसेवकांना सांभाळावे लागते तर काहींपासून सांभाळून रहावे लागते, असा टोला लगाविला.
तर मी आणि उपायुक्तच राहू
सोशलमिडीयावर काही सामाजिक कार्यकर्ते अधिकाऱ्यांना लक्ष्य करतात. यात महापालिका व अधिकाऱ्यांचीही बदनामी होते. माजी आयुक्तांसह महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. अनेक अधिकाऱ्यांना निलंबीत करा, बडतर्फ करा अशी मागणी केली जाते. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर काढले तर महापालिकेत मी आणि उपायुक्त दोघेच कामावर राहू, असा चिमटा काढला.