अशोक डोंबाळेसांगली : बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना सापडल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी भरारी पथकांनी कार्यक्षमपणे काम करावे, असे आदेशही त्यांनी दिले.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.मंत्री खाडे म्हणाले, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीचे उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. दुबार पेरणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यानुसार बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी केली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची सर्व प्रकरणे मार्गी लावून संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.
पाऊस पडेपर्यंत सिंचन योजना चालू ठेवाजलसंपदा विभागाने समाधानकारक पाऊस पडेपर्यंत जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना सुरू ठेवावेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलासाठी एकाही योजनेचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशा सूचनाही मंत्री खाडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बोगसगिरीवर ११ भरारी पथकांची नजरबियाणे, खते आणि कीटकनाशकांची बोगस विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तर भरारी पथके कार्यरत केली आहेत. बोगस खते, बियाणे विक्रीबरोबर जादा दराने विक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.
खते, बियाणांचा पुरेसासाठा : विवेक कुंभारभात ६७३२ क्विंटल, ज्चारी ५६६५ क्विंटल, बाजरी २०२० क्विंटल, तूर ६२१ क्विंटल, मूग २४७ क्विंटल, उडीद ८५१ क्विंटल, भुईमूग १४६८ क्विंटल, सूर्यफूल १२९ क्विंटल, सोयाबीन १३५८६ क्विंटल, मका ६६९८ क्विंटल असे ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. युरिया ५२१०० टन, डी.ए.पी. २०८९१ टन, एम.ओ.पी. २११७५ टन, एस.एस. पी. ३०२८६ टन आणि संयुक्त खतांचा ६४९०२ टन असे एक लाख ८९ हजार ३५४ टन रासायनिक खताची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.