मोहन मोहितेवांगी : ग्रामपंचायतीसमोर करवसुलीचे नेहमीच मोठे आव्हान असते. वसुली कमी झाल्यास थेट परिणाम स्थानिक विकास कामावर होत असतो. त्यामुळेच वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीने कर वसूल व्हावा यासाठी अफलातून योजना सुरू केली आहे. मार्चअखेर थकबाकी पूर्ण करणाऱ्यांचा लकी ड्रॉ काढला जाईल. त्यातून तीन विजेत्यांना सोन्याची कर्णफुले दिली बक्षीस दिली जातील.वांगी ग्रामपंचायत मोठी असून, थकबाकीचे आव्हान मोठे असते. या गावची एकूण १ कोटी ४ लाख करवसुली असून, ती मार्च २०२४ अखेरपर्यंत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी ४० टक्केच करवसुली होते. गावात एकूण ३,०३४ खातेदार, पण प्रत्येकजण थकबाकी भरेलच असे नाही. थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले, गाळे सील केले तरी काही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. कर भरण्यासाठी फार जबरदस्ती करायला लागू नये आणि खुशीने लोकांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरावी यासाठी योजना सुरू करण्याचे ठरवले आहे.
‘करवसुली सुवर्ण बक्षीस योजना’ वांगी ग्रामपंचायतीने खातेदारांना लागू केली आहे. जे घरपट्टी, पाणीपट्टी भरतील त्यांचा योजनेत समावेश होणार आहे. 'करवसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना' या नावाने राबवली जाणार आहे. योजनेत एकूण तीन बक्षीसे ठेवली आहेत. पहिले बक्षिस पाच ग्रॅम सोन्याची कर्णफुले, तर दुसरे तीन ग्रॅम सुवर्ण कर्णफुले आणि तिसरे दोन ग्रॅम कर्ण फुले असे आहे.या वर्षापासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणाऱ्या खातेदारांचा योजनेत समावेश होईल. महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना योजनेत भाग घेता येणार नाही. योजनेची शेवटची तारीख त्दि. १५ मार्च २०२४ पर्यंत राहील. यानंतर कर भरणाऱ्या खातेदारांना योजनेत सहभागी होता येणार नाही. १५ मार्चअखेर संपूर्ण कर भरणाऱ्या खातेदारांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. नावाच्या चिठ्ठ्या लकी ड्रॉ बॉक्समध्ये ठेवण्यात येतील. लहान मुलांकडून तीन चिठ्ठ्या उचलण्यात येतील. लकी ड्रॉ विशेष ग्रामसभेत ‘इन कॅमेरा’ काढण्यात येईल.
करवसुलीत महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी सुवर्ण कर्णफुले योजना आहे. महिला या दुसऱ्याचे देणे असल्यास कुटुंब प्रमुखाच्या पाठीमागे लागून ते देऊन टाकतात. ग्रामपंचायतीची थकबाकीही कुटुंब प्रमुखाला तत्काळ देण्यास भाग पाडतील, म्हणून महिलांसाठी खास सुवर्ण कर्णफुले योजना ठेवली आहे. -वंदना सूर्यवंशी, सरपंच, वांगी