कवठेमहांकाळ : डफळापूरच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला बसाप्पाचीवाडी तलावातून पाणी उचलण्यास पाच गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून प्रशासन दबावाने पाणी नेणार असेल तर या गावातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा या गावांतील शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ तहसीलदारांना आज शुक्रवारी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच काही कार्यकर्ते या योजनेच्या पाण्याला लोकशाही मार्गाने विरोध करताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्नही हाणून पाडू, असे निवेदनात म्हटले आहे.डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी बसाप्पाचीवाडी तलावातून पाणी नेण्यास बसाप्पाचीवाडी, इरळी, मोघमवाडी, कोकळे आणि जत तालुक्यातील अंकले या ग्रामपंचायतींनी एका ठरावाद्वारे विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या पाण्याला पाच गावांतून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सध्या बेकायदेशीररित्या राष्ट्रीय पेयजलचे काम चालू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण होत आहेत. पाण्याचा वाद न्यायालयात असताना काम सुरू करणे, न्यायाविरोधी आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला आम्ही बांधिल आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेला लोकशाही मार्गाने शासनाचे दरवाजे ठोठावणाऱ्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत. हेही अन्यायकारक आहे. कार्यकर्त्यांना पोलिसी बळ दाखवून त्रास दिला तर या पाच गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी बसाप्पाचीवाडी येथे शेतकरी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायाविरुध्द भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणी न देण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या बैठकीस शेकडो ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील पाणी योजनेचे काम बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवार दि. १८ पासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे. काम बंद पाडणाऱ्या बसाप्पाचीवाडी येथील सहा ग्रामस्थांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजना बसाप्पाचीवाडी तलावातून होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत डफळापूर योजनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला. दि. ३ जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तात बसाप्पाचीवाडी तलावात व परिसरात चर खोदणे व जलवाहिनीचे काम सुरू केले. सहा दिवस काम करण्यात आले. सहा दिवसात दोन वेळा बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांनी काम बंद पाडले. जमावापुढे कवठेमहांकाळ पोलिसांचे काही चालले नाही. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. याच्या निषेधार्थ दि. १० रोजी डफळापूरमध्ये बंद पाळण्यात आला. सुनील चव्हाण यांनी ग्रामस्थांवर कारवाईसाठी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली. कवठेमहांकाळ पोलिसांनी भारत ज्ञानदेव ओलेकरसह सहाजणांवर अटकेची कारवाई केली. डफळापूर व बसाप्पाचीवाडी या दोन्ही गावात पाणीप्रश्नावरून संघर्ष पेटला असताना, समझोता करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांनी पुढाकार घेऊन डफळापूरचा कायमस्वरुपी पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. परंतु अद्याप कोणीही अधिकाऱ्यांनी समझोत्याबाबत पुढाकार घेतलेला नाही. यामुळे डफळापूर ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
दबाव आणाल तर रस्त्यावर उतरू
By admin | Published: January 16, 2015 11:31 PM