कवठेएकंद : जीवनात सत्कृत्ये करायची असतील, तर दीनदुबळ्यांच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवा, लोकांच्या सेवेत राहा, सेवाधर्म सदैव जागृत ठेवा, असा संदेश क्रांतिवीर मुनश्री १०८ प्रतीकसागरजी महाराज यांनी प्रवचनात दिला. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील सर्वधर्म सत्संग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनमालेमध्ये सकाळ सत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, जीवनात महान बनण्यासाठी महानता अंगात निर्माण केली पाहिजे. अहंकाराला काढून टाकावे लागेल. माणूस स्वत:साठी बरेच काही करतो, पण दुसऱ्यासाठी काहीच करीत नाही. दुसऱ्यासाठी सेवा करणे लाजिरवाणे वाटते. चंदनाच्या झाडाप्रमाणे वागायला शिका. प्रत्येकाची घरे पक्क्या सिमेंटची बनली आहेत. पण घरातील कुटुंबातील सदस्यांची नाती कच्ची झाली आहेत. नातीही मजबूत बनली पाहिजेत. मुले बिघडायला पालकही जबाबदार आहेत. पालकांनी कर्तव्य पार पाडताना पाल्यांकडेही लक्ष दिले पाहिजे.क्रांतिवीर प्रतीकसागर महाराज यांचे क्रांतिकारी प्रवचन ऐकण्यासाठी कवठेएकंद, नागाव कवठे, कवलापूर, नांद्रे, शिरगाव, तासगावसह बाहेरगावाहून शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली. बसवेश्वर मठाच्या प्रांगणातील सर्वधर्म सत्संग महोत्सवामुळे कवठेएकंद येथे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)‘टच’ कम हो गया है !मोबाईलचा अति वापर झाल्याने आधुनिकतेमुळे टच स्क्रीनच्या वापरामुळे घरा-घरातील व्यक्तींचा एकमेकातील ‘टच’ कमी झाला आहे. त्यामुळे कुटुंब, मित्रपरिवार, गुरु-शिष्य यांच्यातील संबंध कमकुवत बनत आहेत. हे बदलून गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा. प्रेमप्रकरणाला थारा देऊ नका. प्रेमाचा अर्थच कळलेला नाही. प्रेमात स्वार्थ, वासना नको, असे सांगून, ‘प्रेमविवाहाच्या मोहात पडणार नाही, आई-वडिलांची मान खाली घालायला लागेल असे वागणार नाही’, असा संकल्प यावेळी उपस्थित युवक-युवतींकडून करण्यात आला.
जीवनात सत्कृत्य करायचे असेल तर सेवाभाव जागृत ठेवा
By admin | Published: January 14, 2015 10:26 PM