आटपाडी : चीनच्या सैन्याने भारताच्या हद्दीत तंबू ठोकला. बकरी ईदच्या दिवशीच पाकिस्तानने देशाच्या सीमेवर गोळीबार केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत. आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने एवढ्या महत्त्वाच्या कामाकडे कधीही डोळेझाक केली नाही. मोदी केवळ निवडणुकीला महत्त्व देत आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.राष्ट्रवादीचे उमेदवार अमरसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी दिघंची (ता. आटपाडी) येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार म्हणाले की, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेकांनी कृषी क्षेत्रातील बारामती मॉडेलचे कौतुक केले आहे. परंतु मोदींनी कृषी क्षेत्रात बारामती पिछाडीवर गेली असल्याचा अजब शोध लावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्ही वेगळा विदर्भ करू. पंतप्रधान म्हणतात, आम्ही महाराष्ट्राचे विभाजन करणार नाही. हा वैचारिक गोंधळ आहे. राज्याचे तुकडे पाडण्यासाठी यांना मते द्यायची का?या निवडणुकीत उभा राहणार नाही, तब्येत बरी नाही म्हणणारे अनिल बाबर शिवसेनेचे टॉनिक मिळाले म्हणून उभे राहिले काय? अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे उत्तम काम केले. अध्यक्षपद गेल्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून चिकाटीने आटपाडी तालुकाच्या पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली, असे ते म्हणाले. माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारचा फायदा घेणारी काही मंडळी आता राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षात गेली आहेत. निष्ठावान फक्त राष्ट्रवादीत राहिले आहेत. या मतदारसंघाची गेल्या दहा वर्षापासून अवहेलना सुरू आहे. यावेळी सभापती सुमन देशमुख, अशोकराव गायकवाड, हणमंतराव देशमुख आदी उपस्थित होते. (वार्ताहर)होय, आम्ही चुकलो!१९९५ मध्ये राजेंद्रअण्णा आमदार होते. आमदार असताना आम्ही त्यांना थांबायला सांगितले, ही आमची चूक झाली. आम्ही आता अमरसिंह देशमुख यांना उमेदवारी देऊन चूक दुरुस्त केली, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. १९९९ पासून अनिल बाबर यांना एकदा आणि देशमुख यांना एकदा मदत करायचे ठरले होते, मात्र अमरसिंहांना मदत करायची वेळ आली, तेव्हा त्यांनी पक्ष बदलला, असे ते म्हणाले.
मोदींची देशाच्या संरक्षणाकडे डोळेझाक
By admin | Published: October 10, 2014 11:19 PM