अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
सांगली : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध दारूविक्रीमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, तळीरामांमुळे भांडण-तंट्यातही वाढ होत आहे. याचा महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई
सांगली : गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे आदींबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. असे असले तरी, अनेक नागरिक नियम मोडून बाजारात गर्दी करीत आहेत. कोरोनाबाबत लागू असलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.
नगरसेवकांना कोरोना लस देण्याची मागणी
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. नागरिकांच्या समस्या साेडविण्यासाठी, विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नगरसेविका, नगरसेवकांना काम करावे लागते. नागरिकांच्या संपर्कात राहणाऱ्या या लोकप्रतिनिधींना प्राधान्याने कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
सांगली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वाहतूक सुरू आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. होणारी वृक्षतोड पर्यावरणास घातक असून, ही वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांची गैरसोय
सांगली : शहरातील प्रमुख बाजारपेठेतील मुख्य मार्गावरच अनेक वाहनचालक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे इतर वाहन चालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, याचा सर्वाधिक त्रास पादचारी नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.
कार्यालयात वाढली अस्वच्छता
सांगली : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही परिस्थिती दिसून येते. या भागात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र, इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. फरशा उखडल्या असून, भिंतींचे कोपरे पान खाऊन थुंकल्याने रंगले आहेत.
रस्त्यावर खड्डे
सांगली : शहरातील जुना बुधगाव रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर समाजकल्याण विभागाचे शासकीय कार्यालयही आहे. मात्र, खराब रस्त्यांमुळे नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अस्वच्छता वाढली
सांगली : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. गटारीतून पाणी वाहून जाण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. त्यामुळे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
मास्कची विक्री वाढली
सांगली : जिल्ह्यात कोरोनामुळे मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यामुळे शहरी भागात मास्कची विक्री वाढली आहे. बाजारपेठ भागातील रस्त्याकडेला अनेक ठिकाणी मास्क विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत.
उसाचे क्षेत्र वाढले
सांगली : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांच्या पाण्यावर शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल वाढविला आहे.