शरद जाधव
सांगली : कधी हौस म्हणून तर कधी दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढत असताना, पोलिसांकडूनही अशा ‘बुलेट राजां’च्या मुसक्या आवळल्या जात आहेत. परराज्यातून पिस्तूलांची तस्करी करून ते जिल्ह्यात विक्रीच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, अनेक तरुण पैशाच्या आमिषाने यात अडकले आहेत.
पिस्तूलासह इतर शस्त्र बाळगण्यासाठी शासनाचा परवाना आवश्यक असतो; मात्र अनेक जण स्वसंरक्षणाच्या नावाखाली ‘घोडा’ खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातून या शस्त्रांची तस्करी होत असते. यावर अंकुश मिळवत पोलिसांनी २२ जणांना अटक करत ८ लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यापासूनच अवैध शस्त्रविक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करत रॅकेट मोडीत काढले होते. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही या तस्करांवर कारवाई करत शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
या राज्यांतून तस्करी
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यातून देशी बनावटीची पिस्तूल, गावठी कट्ट्याची तस्करी करण्यात येते. पोलिसांनी मात्र या तस्करांच्या स्थानिक पंटरांना ताब्यात घेत कारवाई सुरूच ठेवली आहे.
खरेदीदारांवरही हवा वचक
पोलिसांकडून पिस्तूलांची तस्करी करत ती विक्रीचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे; मात्र यात ते खरेदी करणारे नामानिराळेच राहत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अवैधरीत्या ही शस्त्रे खरेदी करणाऱ्यावरही कारवाईचा बडगा उगारल्यास तस्करी मोडीत निघण्यास मदत होणार आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई
जप्त देशी पिस्तूल ९
गावठी पिस्तूल ८
रिव्हॉव्हर २
गावठी कट्टा ३
काडतुसे ३५
दाखल गुन्हे १६
अटक संख्या २१
जप्त केलेला माल रक्कम ८ लाख ६५ हजार रुपये
जप्त केलेली काडतुसे रक्कम १४ हजार ९००
वरिष्ठांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पथक नेहमीच अवैध शस्त्र विक्रीच्या तयारीत असणाऱ्या संशयितांवर कारवाई सुरू आहे. यापुढेही शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील. -सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक, एलसीबी.