लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील काही बेघरांनी एकत्र येऊन गावाच्या पश्चिमेस डोंगरालगतच्या शासकीय जमिनीचा ताबा घेतला आहे. येथे शेडवजा घरांचे बांधकामही सुरू केले आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
खरसुंडी येथे गावच्या पश्चिमेस डाेंगरालगत शासनाची गट नं. १७२ मध्ये ४ हेक्टर ४४ आर सरकारी पडीक जमीन आहे. या जागेचा गावातील काही बेघरांनी ताबा घेतला असून, दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांनी दिवसभर राबून आणि लाखो रुपये खर्च करून जमिनीचे सपाटीकरण करून घेतले आहे. डाेंगरालगत असलेली ही जमीन राहण्यायोग्य करून घेतली आहे. लाकूडफाटा, लोखंडी, तसेच सिमेंटचे खांब उभे करून शेडवजा घरांचे काम सुरू केले आहे. काही लोक येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यही करीत आहेत. या प्रकाराकडे ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष आहे.
खरसुंडी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, विकासकामे आणि सेवा सुविधांपासून वंचित राहिले आहे. गावात कुठेही सुलभ शौचालयासाठी जागा उपलब्ध होत नाही. गावात गावठाण, ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासन, गायरान, देवस्थानच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. मात्र, त्यावर यापूर्वीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. याकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमण झालेल्या जागा मोकळ्या करून त्या ताब्यात घ्याव्यात, तसेच खराेखरच बेघर असलेल्या ग्रामस्थांना कायदेशीररीत्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. देवस्थानच्या ठिकाणी दूरदृष्टी ठेवून सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
काेट
खरसुंडी येथील गट नं. १७२ मधील सरकारी पडीक जमिनीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण झाले आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
- सचिन मुळीक
तहसीलदार, आटपाडी
——————-
काेट
खरसुंडी येथील खराेखर गरजू असलेल्या बेघर लोकांनी ग्रामपंचायतकडे जागेची मागणी नाेंदवावी. कागदपत्रांची पूर्तता करावी. ग्रामसभेची मान्यता घेऊन गरजूंना शासन पातळीवर जागा देण्यासाठी प्रांताधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करू.
- लता पुजारी
सरपंच, खरसुंडी