फोटो ओळ : भिवर्गी (ता. जत) येथील बोर नदीच्या पात्रात अवैध वाळू उपशाने मोठे-मोठे खड्डे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : महसूल विभाग, पोलिसांच्या दुर्लक्षाने जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरु आहे. नदीपात्रात मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. काळ्या सोन्याची लूट सुरु आहे. महसूल विभाग कोमात, वाळू तस्करी जोमात अशी अवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
पूर्व भागातील भिवर्गी, करजगी, संख, सुसलाद, हळ्ळी, बेळोंडगी, सोनलगी, बालगाव या गावाजवळ बोर नदीचे पात्र मोठे आहे. संख अप्पर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत सिध्दनाथ-सुसलाद पर्यंत ६४ कि. मी लांबीचे ओढा पात्र आहे. येथे बांधकामासाठी वाळू मिळते. व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. काही जणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत.
‘उन्हाळ्याचा महिना, वाळू माफियाचा महिमा’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. काळ्या सोन्याच्या तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे.
वाळू भरायला विरोध केल्यावर शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते. भिवर्गी (ता. जत) येथे वाळू तस्करी विरोधात या आठवड्यात गुन्हा नोंद झाला आहे.
चाैकट
चोर-पोलिसांचा खेळ
महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करुन, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहेत. काहीवेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने पसार होतात.
चाैकट
दक्षता समित्या गायब
तत्कालीन अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांनी वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामसेवक, कोतवाल, गाव कामगार तलाठी यांची दक्षता कमिटी केली होती. दक्षता कमिटीमुळे कागनरी, खंडनाळ, पांढरेवाडी या गावातील वाळू तस्करी बंद झाली होती. त्यांची बदली झाल्यानंतर वाळू तस्करी जोमाने सुरु झाली आहे. दक्षता कमिटी गायब झाली आहे. ती कागदावरच आहे.