संख : खंडनाळ (ता. जत) येथील बोर नदीपात्रात डंपर व जेसीबीच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू व्यवसायावर कार्यवाही करावी. ताबडतोब वाळू उपसा थांबवण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष राजू पुजारी, सामाजिक कार्यकर्ते मिरासाहेब मुजावर यांनी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संख अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत खंडनाळ हे गाव संखपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. तालुक्यात वाळू उपसा बंद असताना खंडनाळ येथे मात्र रात्री बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. याठिकाणीच वाळू उपसा का आणि कसा चालताे याचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. अवैध वाळू उपशामुळे बोर नदीकाठाच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मात्र मोठे नुकसान होत आहे. शेतीला अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. शेतीचा बांध फुटून जाण्याचा धोका आहे. मातीची धूप होऊन शेती वाहून जाणार आहे. वाळूच्या अतिउपशाने पात्रात मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. पात्रातील वाळू संपुष्टात येणार आहे. यातून महसूल विभागाचा कोट्यवधींचा महसूल बुडणार आहे. याकडे महसूल विभागाने धडक मोहीम राबवून वाळू तस्करीला आळा घालावा. दोन दिवसांत संबंधित वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई न केल्यास बोर नदीपात्रात धरणे आंदोलन करण्याचा इशारा ३० शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. निवेेेदनावर मिरासाहेब मुजावर, राजू पुजारी, अशोक चंचलकर, शिवानंद राजमाने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश वाघोली यांच्या सह्या आहेत.
फोटो : येणार आहे
ओळ : खंडनाळ (ता. जत) येथे वाळू उपसाने बोर नदीपात्रात मोठे-मोठे खड्डे पडले आहेत.