सांगली : महापालिका कार्यालयात असो अथवा घरात, मी सतत कामात असतो. गप्पा मारत बसत नाही. आयुक्तांचा जास्तीत जास्त वेळ समाजाप्रति जावा, हीच माझी भूमिका आहे. लोकांच्या चेहºयावरील आनंदातच माझे समाधान असते. त्यामुळे टीका करणाºयांना मी थांबवू शकत नाही, अशा शब्दात मंगळवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी टीकाकारांवर पलटवार केला.
आयुक्त खेबूडकर यांनी कार्यभार हाती घेऊन येत्या ९ जूनला दोन वर्षे होत आहेत. त्यांच्यावर अनेकदा दिरंगाईची टीका झाली आहे. पालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी व आयुक्तांत गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष उफाळून आला आहे. मंगळवारी आयुक्तांनी दोन वर्षातील कामाचा आढावा घेतला. यावेळी पालिकेतील नगरसेवक, पदाधिकाºयांत समन्वय नसल्याबद्दल विचारता ते म्हणाले की, माझ्याकडे पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. अधिकारी हा कुठल्याही पक्षाचा नसतो. तो केवळ प्रशासकीय अधिकारी असतो. समाजात काम करताना साधनसुचिता पाळण्याची गरज आहे. माझा जास्तीत जास्त वेळ समाजासाठी खर्ची व्हावा, अशीच भावना आहे. मी कधी गप्पा मारत बसत नाही. कुठेही असलो तरी सतत कामात असतो, असे म्हणत, टीका करणाºयांना थांबवू शकत नाही.
विकास कामांबाबत ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यात शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. दर्जेदार रस्ते करण्यास प्राधान्य दिले होते. खराब रस्ते करणाºया ठेकेदाराला नोटिसाही बजाविल्या आहेत. रस्ते, इमारत बांधकामांच्या कामांची बिले थर्ड पार्टी आॅडिट केल्याशिवाय अदा न करण्याचा निर्णय घेतला. नव्याने २१ उद्याने मंजूर केली आहेत. त्यासाठी शासनाकडून साडेचार कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. महापालिका निधीतूनही पाच उद्याने उभारली जाणार आहेत. त्यामुळे शहरात पूर्वीची २८ व नव्याने २६, अशी ५४ उद्याने होतील. सांगलीत सर्किट हाऊसमागील जागेत पक्षी उद्यानाचाही प्रस्ताव आहे.
आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला, तेव्हा ड्रेनेज योजनेचे २९ टक्के काम झाले होते. आता दोन वर्षात ६९ टक्क्यापर्यंत काम पोहोचले आहे. आॅक्सिडेशन पाँडचे काम पूर्ण झाले असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. ड्रेनेज योजनेचे काम सुरू करताना सांगलीत तीन व मिरजेतील दोन संप व पंपगृहांची जागा ताब्यात घेण्याची गरज होती. पण जागा ताब्यात नसताना काम सुरू केल्याने या योजनेला विलंब लागल्याचेही खेबूडकर म्हणाले.
नालेसफाईचे काम गतीने सुरू आहे. चार प्रभाग समितीत ७५ किलोमीटर लांबीचे ६२ नाले आहेत. त्यापैकी ९ मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण होईल. राज्य शासनाने रोस्टरला मंजुरी दिली आहे. सेवा नियम व रोस्टर मंजूर झाल्याने भविष्यात नोकर भरतीचा मार्ग खुला होणार असल्याचेही ते म्हणाले.दोनशे कोटींची कामे केली : आयुक्तमहापालिका आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेऊन दोन वर्षे होत आली आहेत. या काळात मी जनतेशी व शासनाशी प्रामाणिक राहत काम करीत आहे. आतापर्यंत माझ्याकडे ६१२० फायली आल्या. त्यापैकी ५९२६ फायली मंजूर केल्या असून, सुमारे २०० कोटींच्या कामांना मान्यता दिली. नगरविकास व महसूल विभागातील अधिकाºयांत काम करण्यात मोठा फरक असतो. तो माझ्या कामातून जनतेला दिसला आहे, असा टोलाही आयुक्त खेबूडकर यांनी लगाविला.