आयुष मंत्रालयाच्या नवीन अधिसूचनेनुसार एकूण ५८ शस्त्रक्रिया कार्यपद्धती, जनरल सर्जरी, मूत्ररोग शस्त्रक्रिया, पोटाच्या व आतड्याच्या शस्त्रक्रिया नाक-कान - घसा, नेत्ररोग, दंतरोग या सर्व शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र व शालाक्यतंत्र’ या नावाखाली पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. या आयुर्वेद विद्यार्थ्यांना या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या अधिसूचनेनुसार ५८ शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण दिल्यावरच या वैद्यांना या शस्त्रक्रिया करता येतील. सीसीआयएमने या सर्व आयुर्वेदिकच शस्त्रक्रिया आहेत असा शोध लावल्याची टीका आयएमएने केली आहे. आयुर्वेद किंवा आयुर्वेदिक पदव्युत्तर वैद्यांना विरोध नसून आयुष मंत्रालयाच्या कृतीला आणि निर्णयप्रक्रियेला विरोध असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. वैद्यांना केवळ वरवरची तंत्रे शिकवून शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरवणे हा रुग्णांवर प्राणघातक अन्याय ठरणार आहे. यामुळे सर्जिकल प्रक्रियेची सूचना मागे घ्यावी. मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देणार्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व समित्या बरखास्त करण्याची मागणी आयएमएने केली आहे. सीसीआयएमच्या या अधिसूचनेमुळे राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणार्या २० हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंध:कारमय होणार असल्याने याविरुद्ध आयएमएच्या आंदोलनास मार्ड व ज्युनिअर डॉक्टर्स संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. ८ डिसेंबर रोजी प्रत्येक शहरात आयएमए सदस्य डॉक्टर निदर्शने करतील. ११ डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात व देशात आपत्कालीन व कोविड सेवा वगळता वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याचे मिरज आयएमएचे अध्यक्ष डाॅ. शशिकांत दोरकर यांनी सांगितले.
वैद्यांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्यास ‘आयएमए’चा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:20 AM