सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 502 लाभार्थ्यांना 32 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून आत्तापर्यंत 80 लाख रुपये व्याज परताव्याची रक्कम अदा केली आहे, व्याज परताव्याची मंजूर रक्कम शासन 100 टक्के अदा करित आहे, त्यामुळे बँकांनी कर्जाच्या हमीबाबत शंका न बाळगता तात्काळ प्रकरणे मंजूर करावीत असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र यादव, बँकर्स, जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार अधिकारी सं. कृ. माळी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील, किशोर साळुंखे, विशाल पाटील, निशा पाटील, शितल पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई तसेच जिल्हातील विविध बँकांचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संजय पवार म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 32 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून आत्तापर्यंत 80 लाख रुपये इतकी व्याज परताव्याची रक्कम अदा करण्यात आली आहे.
व्याज परताव्याची मंजूर रक्कम शासन 100 टक्के अदा करित आहे, त्यामुळे बँकांनी कर्जाच्या हमीबाबत शंका न बाळगता तात्काळ प्रकरणे मंजूर करावीत असे आवाहनही त्यांनी उपस्थित सर्व बँकांना केले. तसेच या योजनेच्या शासन निर्णयात ज्या अटी व शर्तींमध्ये नमुद नाही अशा अटी व शर्ती लागू करुन कोणतेही कर्ज प्रकरण नामंजूर करु नये, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या योजनेचा मुख्य उद्देश तळागाळातील सुशिक्षत तरुण-तरुणींना व्यावसाय सुरु करण्यासाठी मदत करणे असा आहे. तरुणांनी नोकरी मागे न धावता नोकऱ्या निर्माण करणारा व्यवसायीक बनावे असे आवहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनूसार तयार करण्यात आलेल्या अर्जांची नोंद व सदस्थिती पाहण्यासाठीच्या वेब पोर्टल ॲप्लीकेशनचे उद्घाटन संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या ॲप्लीकेशन पोर्टलमुळे लाभार्थ्याची सद्यस्थिती समजणार आहे. व प्रलंबित प्रकरण निपटारा करण्यासाठी मदत होणार आहे. जास्त काळ लाभार्थ्याची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवता येणार नाहीत. 15 दिवसांच्या आत लेखी नोटसीने सोडविण्यासाठीचे बँकांना बंधनकारक राहिल. यावेळी संजय पवार यांनी या पार्टलची माहिती घेवून जिल्हाधिकारी यांचे मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील यांनी केले. तर आभार जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार अधिकारी सं. कृ. माळी यांनी मानले