लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटेकरांना नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. नागरीकांची एकही तक्रार आमच्यापर्यंत यायला नको याची दक्षता घ्या, असे सांगून विटा शहरात अनियमीत व पुरेसा पाणीपुरवठा होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत संपूर्ण पाईपची गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील मुल्ला गल्ली येथील महिलांनी पाण्यासाठी थेट विटा नगरपरिषदेत जाऊन संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पालिकेत पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनी खडेबोल सुनावले.
वैभव पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे नगरपालिकेचे कर्तव्यच आहे. त्याचे संबंधित विभागाकडून पालन होताना दिसत नाही. जर कोणी आपल्या कामात चूक केली किंवा हलगर्जीपणा केल्यास त्याची गय केली जाणार नाही. घोगाववरून विटा शहराला पाणीपुरवठा होत आहे. त्याठिकाणी वीज अथवा पंपांचा काही घोटाळा झाला तरच एखादा दुसरा दिवस पाणी मागे-पुढे होऊ शकते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, विटा शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असेही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले. यावेळी नगरसेवक फिरोज तांबोळी, राहुल हजारे, संजय सपकाळ, अॅड. धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, भरत कांबळे, राजेंद्र जिरमे, आप्पा पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.