येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील वनश्री नानासाहेब महाडिक यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा सोमवारी रक्षाविसर्जनाचा विधी होता. परंतु त्यांच्या रक्षा पाण्यात विसर्जित न करता त्यांच्या ‘वनश्री’ पदवीला साजेशा पध्दतीने आंब्याच्या रोपाचे रोपण करून त्याला रक्षा विसर्जित करण्यात आली.नानासाहेबांनी वृक्ष लागवडीवर केलेले काम पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना पहिला ‘वनश्री’ पुरस्कार मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याहस्ते देऊन त्यांना गौरविले होते. त्यावेळेपासून नानासाहेबांची ‘वनश्री’ ही आणखीन एक नवीन ओळख बनली. त्यामुळेच नानासाहेबांची रक्षा पाण्यात विसर्जित न करता वृक्ष लावून त्या वृक्षाला अर्पण करावे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी ठरविले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र, वाळवा पंचायत समिती गटनेते राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी वृक्षाला नानांची रक्षा विसर्जित केली. यावेळी ज्येष्ठ बंधू, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, बबन महाडिक उपस्थित होते.रक्षाविसर्जन विधीवेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार मोहनराव कदम, विलासराव जगताप, आनंदराव पाटील, सुजित मिणचेकर, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, अभिजित पाटील, महेंद्र लाड, जितेंद्र पाटील, रणधीर नाईक, पृथ्वीराज पवार, बाळासाहेब पाटील, आर. डी. पाटील, जगन्नाथ माळी यांनी नानासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.मागेल त्या गावाला स्वनिधीतून मदतनानासाहेब महाडिक यांचे झाडांवर अतोनात प्रेम होते. नानासाहेबांनी १९९० मध्ये स्वत:च्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. मागेल त्या ग्रामपंचायतीला स्वनिधीतून वृक्षांची रोपे दिली होती.
येलूरला आंब्याचे झाड लावून नानासाहेबांच्या रक्षा विसर्जित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:33 PM