सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्यादिवशी सांगली शहरात शुकशुकाट होता. मेडिकल्स वगळता सर्वच आस्थापने बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर नव्हते. शहरातील प्रमुख चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.कोरोनामुळे जिल्ह्यात गुरुवारपासून आठ दिवस लॉकडाऊन लागू केली आहे. तरीही सकाळच्या टप्प्यात काही प्रमाणात रस्त्यावर नागरिकांची रेलचेल होती. दूध खरेदीसाठी काही नागरिक घराबाहेर पडले होते. मारूती चौकात पोलिसांनी नागरिकांना अडवून त्यांना पुन्हा घराकडे पाठविले. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रशासकीय कर्मचारी, पोलीसच रस्त्यावर दिसत होते.
शहरातील मारुती रोड, कापडपेठ, राजवाडा चौक, स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग परिसर, टिंबर एरिया, शंभरफुटी रस्ता या सर्वच परिसरात शुकशुकाट होता. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यासाठी संपूर्ण शहरात वाहने फिरत होती. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचनाही देण्यात येत होती.टास्क फोर्सचे संचलनमहापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसाठी माजी सैनिकांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. सांगलीत १० तर मिरज व कुपवाडमध्ये प्रत्येकी पाच माजी सैनिक टास्क फोर्समध्ये आहेत. गुरुवारी या टास्कफोर्सने शहरात संचलन करीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.हे होते बंदहे होते बंद : कापड पेठ, हरभट रोड, मारुती रोड, गणपती पेठेतील सर्व दुकाने, मार्केट यार्ड, विश्रामबागसह उपनगरांतील सर्व दुकाने, हॉटेल्स, नाष्टा सेंटर, बेकरी, पानटपऱ्या, रिक्षा, खासगी वाहने, भाजी मंडई, किराणा दुकाने, हातगाडे.हे होते सुरू : औषध दुकाने, पेट्रोलपंप, बँका.