सांगली : सन 2030 पर्यंत जगात 80 लाखापेक्षा जास्त लोक तंबाखू सेवनामुळे मृत्यूमुखी पडतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे तंबाखू सेवन टाळणे किंवा तंबाखू मुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिले.
तंबाखूचे सेवन हे कॅन्सर सारख्या रोगाला निमंत्रण देते. त्याचबरोबर इतर अनेक रोग जडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तंबाखू सेवन टाळणे हितावह आहे. भारत देश तंबाखू सेवनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2004 च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे 8 ते 9 लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शहानवाह नायकवडे, अन्न सुरक्षा अधिक्षक र. ल. महाजन, पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व समिती सदस्य उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, राष्ट्रीय कौटुंबिय आरोग्य सर्वेक्षण 4 मध्ये सुमारे 33 टक्के तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना ते सोडण्यासाठी जिल्हास्तरावर विविध समुपदेशनाचा कार्यक्रम राबविण्यात यावे. त्याचबरोबर शालेय शिक्षणात आरोग्य कार्यक्रम घेण्यात यावे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांच्या नियमांचे व कायद्यांचे सनियंत्रण करण्यात यावे.
जिल्ह्यातील तंबाखू मुक्ती नियंत्रण केंद्रांची स्थापना करण्यात यावी. तसेच अस्तित्वात असणाऱ्या केंद्रांचे बळकटीकरण करण्याबरोबरच या ठिकाणी उपचाराचीही सोय करण्यात यावी. जिल्ह्यात 8 समुपदेशन केंद्रांची स्थापना करण्यासाठी शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर, कवठेमहांकाळ व ग्रामीण रूग्णालय शिराळा, विटा, पलूस, आटपाडी, कडेगाव व तासगाव या ठिकाणी तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 381 तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर आहेत. तर 150 आरोग्य संस्था प्रगतीपथावर आहेत. तसेच टी.सी.सी. मध्ये नोंदणी झालेल्या रूग्णांची संख्या 119 आहे. तरी संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा, तंबाखू मुक्त शासकीय कार्यालये तसेच तंबाखू मुक्त झोन निर्माण करण्यावर भर द्यावा. या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.