ओळी - वारणा पाणी योजनेबाबत मदनभाऊ युवा मंचच्यावतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पावसाळ्यात शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत असते. अनेकदा शेरीनाल्यावरील पंप बंदच असतात. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यासाठी वारणा पाणी योजना अंमलात आणावी, अशी मागणी मदनभाऊ युवा मंचच्यावतीने करण्यात आली आहे. याविषयी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेतली. यावेळी लेंगरे म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून सांगलीला शेरीनाल्याचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिवगंत मदनभाऊ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वारणा उद्भव पाणी योजना मंजूर करण्यात आली. पण तांत्रिक अडचणीमुळे ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. नागरी वस्तीत पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन करण्यात आल्या आहेत. आता वारणा नदीतून पाणी उपसा करून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे काम शिल्लक आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यास नागरिकांचे वारणेच्या पाण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेचा पुनश्च श्रीगणेशा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक शुभांगी साळुंखे, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संजय कांबळे, सुहास पाटील, अरविंद पाटील, तौफिक बिडीवाले, अक्षय दोडमनी, सचिन कदम, आदी उपस्थित होते.