सांगली : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सुंदर आकार देणे ही शिक्षक आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी असून, शालेय संस्कारांना जीवनात महत्त्वाचे स्थान असल्याचे मत डॉ. शरद हर्डीकर यांनी व्यक्त केले. सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सव सांगता समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. हर्डीकर म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा शोध घेणे आवश्यक आहे. संस्थेच्या वाटचालीत शताब्दीला महत्त्व आहे. भविष्यात सांगली शिक्षण संस्थेने यापेक्षाही उत्तुंंग भरारी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. न. म. जोशी म्हणाले, राष्ट्रभक्ती आणि जीवनमूल्यांची विचारधारा हीच या संस्थेची विचारधारा आहे. संस्कार हा क्षणिक असला तरी तोच अनंतकाळ टिकणारा असतो. भविष्यकाळात विद्यार्थ्यांना अनौपचारिक शिक्षण देणे आवश्यक आहे. देशाची परिस्थिती पालटण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन एकशे एक वर्षीय रावसाहेब लागू यांनी केले. याप्रसंगी संस्थेचा शंभर वर्षाचा इतिहास सांगणाऱ्या ‘इतिहास’ या ग्रंथाचे, भावी काळाचा वेध घेणाऱ्या ‘भविष्यवेध’ तसेच शताब्दी महोत्सवानिमित्ताने साकारलेल्या ‘शतपदी’ या खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये, शशिकांत देशपांडे, य. शं. गाडगीळ, अरुण दांडेकर आदींसह संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शालेय संस्कारांना जीवनात महत्त्व
By admin | Published: December 04, 2014 11:32 PM