इस्लामपूर , दि. २८ : नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करीत लूटमार केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोघा आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अविनाश ऊर्फ डुबरंग कांतिलाल काळे (वय २५, रा. डिगीयासगाव, जि. औरंगाबाद) व ज्ञानेश्वर ऊर्फ देण्या परतान्या काळे (३0, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना १५ दिवस साधी कैद भोगावी लागणार आहे.
दोन वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला होता. महामार्गावरील लूटमार, मारहाणीसह विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत होत्या. अशाच काळात वरील दोघा आरोपींनी १५ जून २0१५ च्या रात्री ९.३0 च्या सुमारास कासेगाव येथे जेवण करुन नेर्ले येथे मोटारसायकलवरुन सेवा रस्त्याने परतणाऱ्या सचिन पांडुरंग पाटील व त्याचा चुलत भाऊ नीलेश पाटील, मित्र समाधान साळुंखे यांना अडवले.
दुचाकी चालविणाऱ्या नीलेश याच्या तोंडावर काठीचा जोरदार तडाखा लावून त्यांना खाली पाडले. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेऊन मारहाण केली. त्याचदिवशी याच रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या राहुल रामचंद्र निकम, शशिकांत बर्गे यांनादेखील देसाई मळा परिसरात आरोपींनी लोखंडी गज व गाठीने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व रोकड चोरली होती.
याप्रकरणी सचिन पांडुरंग पाटील (रा. नेर्ले) यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी, महामार्गावर दहशत माजवून अनेक जबरी चोºया करणाºया या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला. पोलिस हवालदार एम. के. गुरव, बी. डी. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी खटल्याकामी सरकार पक्षास मदत केली.
शेवटची शिक्षा...इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पहिले जिल्हा न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडणारे एस. व्ही. कुलकर्णी येत्या ३१ आॅक्टोबररोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी चार दिवस अगोदर त्यांनी कारकीर्दीतील शेवटची शिक्षा सुनावली. न्यायालयात त्यांच्या या कामगिरीची चर्चा होती.