सांगली : अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. संपत सीताराम फाळके (वय ५५, रा. जुळेवाडी ता. तासगाव) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.खटल्याची अधिक माहिती अशी की, आरोपी फाळके याने कोरोना कालावधीत पिडीत मुलीला पुणे येथून शिक्षणासाठी स्वत:कडे आणले होते. यानंतर त्याने तिच्याची जबरदस्तीने वारंवार शरीरसंबंध ठेवले. १ जुलै २०२१ रोजी पिडीतेला घेऊन पलूस येथील रूग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती सहा ते सात महिन्याची गरोदर असल्याची लक्षात आले. यानंतर डॉक्टरांनी तातडीने याबाबत पलूस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानंतर मिरज शहर पोलिस ठाण्यात अनोळखी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा गुन्हा तासगाव पोलिसांच्या हद्दीत झाल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला. पिडीतेकडे केलेल्या अधिक चौकशीत आरोपी फाळके यानेच जबरदस्ती केल्याचे तिने सांगितले. सरकारपक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात आरोपी हाच पिडीतेच्या बाळाचा पिता असल्याचे सिध्द झाले. यानंतर न्यायालयाने त्याला दोषी धरत मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास मरेपर्यंत कारावास, ‘पोक्सो’अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिलीच मोठी शिक्षा
By शरद जाधव | Published: August 22, 2023 6:12 PM