ओळ : आसद येथे घरगुती व शेतीपंपाची वाढीव बिले यासंदर्भात श्रीदास होनमाने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय जाधव, दीपक लाड, डी. एस. देशमुख, अमोल चव्हाण उपस्थित हाेते.
देवराष्ट्रे : गेले सात वर्षे शेतीपंपाचे कोणतेही रिडिंग घेतलेले नाही. ज्या मीटरचे रिडिंग घेतलेले नाही, ते बिल कलम २००३/५६ नुसार अनिवार्य नाही. असा महावितरणचा ग्राहकांच्या बाजूने नियम आहे. परंतु या नियमाला महावितरण कंपनी केराची टोपली दाखवून शेतीपंपाचे अव्वाच्या सव्वा बिल शेतकऱ्यांना देऊन सक्तीने वसूल करत आहे. तसेच घरगुती वीज बिलांचे चुकीचे रिडिंग दुरुस्त न करता कनेक्शन तोडण्याची कारवाई करत आहे. याविरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा श्रीदास होनमाने यांनी दिला आहे.
घरगुती व शेतीपंपाच्या वाढीव बिलासंदर्भात आसद (ता. कडेगाव) येथे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी होनमाने बोलत होते. यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख, दीपक लाड, संग्राम जाधव उपस्थित होते.
नवीन कनेक्शनला अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत महावितरण कंपनीने कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु कंपनीकडे ग्राहकाला वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. या कारभारामध्ये सुधारणा न झाल्यास कडेगाव पलूस तालुक्यातील सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल चव्हाण म्हणाले, शेतकरी हा गेली दीड वर्षे महापूर, अतिवृष्टी, कोरोना व अवकाळी अशा अनेक संकटांना तोंड देऊन कसातरी सावरत आहे. त्यात महावितरणने शेतकऱ्यास चुकीची हुकूमशाहीची बिल देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू.
यावेळी उपसरपंच विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील, सूरज जाधव, संदेश जाधव, गोरख औंधी, प्रकाश मोरे उपस्थित होते.