शिराळा :
रासायनिक खतांचा बेसुमार वापर व सेंद्रिय अन्नद्रव्ये व्यवस्थापन नसल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.
बिघडलेले जमिनीचे आरोग्य सुधारणे, खतांचा समतोल वापर करणे, जमिनीमध्ये होणारे प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त शिराळा तालुक्यातील औंढी, आंबेवाडी, वाकुर्डे, गिरजवडे, बिळाशी, कोकरूड येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस यामुळे जमिनीची धूप होत आहे. आपण कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही. हे वास्तव आहे. यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी आपण आपल्या शेतजमिनीचे नियमित माती परीक्षण करावे. याने आपल्या जमिनीची सुपिकता कळेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
या कैलास कारंडे, एस. डी. घागरे, दादासाहेब पडवळ, अनिल पाटील, अमोल माळी, अभय पाटील, बाबासाहेब जाधव, सुशांत पाटील, सुरेश धुमाळ, रघुनाथ धुमाळ उपस्थित होते.