शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तडवळे (ता. शिराळा) येथील कोरोनाबाधित रुग्णाची डोळ्यांची अचानक नजर कमी झाल्याने त्याची म्युकरमायकोसिसच्या दृष्टीने सर्व तपासणी करण्यात येत आहेच. मात्र येथील डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी औषधोपचार सुरू केल्याने संबंधित रुग्णास ५० टक्के दिसू लागले आहे. या रुग्णाची ऑक्सिजन पातळीही स्थिर असून, ताे कोरोनामुक्त झाला आहे.
तडवळे येथील संबंधित रुग्ण कोरोनावर उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे. उपचारादरम्यान त्यास डोळ्याने दिसणे जवळपास बंद झाले होते. त्याचे डोळेही लाल दिसत हाेते. त्यामुळे तातडीने डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी त्याची सर्व तपासणी केली. उपचारानंतर त्याची कोरोना अँटिजन चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. नाकातील स्त्राव मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञ प्रमोद काकडे यांनी तपासणीसाठी घेतला. म्युकरमायकोसिसची शक्यता बळावल्याने त्यास पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवण्यात येणार होते.
मात्र या रुग्णावर डॉ. नितीन जाधव व डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी उपचार सुरू केले. त्यास संबंधित रुग्णाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. आता या रुग्णास रंग ओळखू लागले आहेत. तसेच डाेळ्यांचा लालसरपणाही कमी झाला आहे. हा रुग्ण जवळपास ५० टक्के बरा झाला आहे. शनिवारी त्याची ऑक्सिजन पातळीही स्थिर असल्याने ऑक्सिजन बंद केला आहे. तसेच त्याची आरटीपीसीआर चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे धाडसाने उपचार करणाऱ्या डॉ. जाधव डॉ. काकडे तसेच त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक होत आहे.