बोरगाव : मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशावर ५६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. १० वर्षांत ते २१० लाख कोटी रुपयांवर गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योग, रोजगार हे काहीही न करता मूठभर श्रीमंतांची २५ लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे काम त्यांनी केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.बोरगाव (ता. वाळवा) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सत्यजित पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशावरील कर्जे कमी करण्यासाठी जीएसटीसारखे कर वाढविण्याचा धोका आहे. एक लाखाची खते घेतली, तर त्यातून १८ हजार रुपये जीएसटी भरावा लागतो. त्यातूनच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. ही पाकीटमारी आहे.सत्यजित पाटील म्हणाले, भाजपने गेल्या १० वर्षांत अशी कोणती कामे केली, की ज्याच्या जोरावर ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याची भाषा भाजप करीत आहेत. पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री नसल्यानेच सत्तेचा गैरवापर करून दुसऱ्यांचे पक्ष फोडत आहेत.उपसरपंच सचिन पाटील, तानाजी पाटील, शकील सय्यद, योजना पाटील, अभिजित पाटील, कार्तिक पाटील, धैर्यशील पाटील, उदय शिंदे, शिवाजी वाटेगावकर, संजय पाटील, देवराज देशमुख आदी उपस्थित होते.
भाजपने देशाला कर्जाच्या खाईत ढकलले, जयंत पाटीलांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 3:26 PM