विटा (सांगली) : भाळवणी (ता. खानापूर) येथे येरळा नदीत पाय घसरून पडल्याने पाण्यात तयार झालेल्या भोवऱ्यात अडकून श्रीमंत ऊर्फ अशोक कृष्णा बोबडे (वय ५५) यांचा बुडून मृत्यू झाला. पत्नीच्या डोळ्यादेखत पती पाण्यातून वाहून गेल्याची ही घटना आज, सोमवारी घडली.भाळवणी येथील अशोक बोबडे व त्यांची पत्नी सुवर्णा सणानिमित्त अंथरूण व अन्य कपडे धुण्यासाठी येरळा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस गेले होते. तेथे मोरीतून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे तेथे पाणी उंचावरून खाली पडत असल्याने खोलगट भाग तयार झाला आहे.बोबडे दाम्पत्य कपडे धूत असताना अचानक अशोक यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात पडले. यावेळी तेथील पाण्यात भोवरा तयार झाला होता. या भोवऱ्यात अडकल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. ते पाहून सुवर्णा यांनी आरडाओरड केली. पंचायत समितीचे सदस्य संजयकुमार मोहिते यांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने तरुणांना घेऊन घटनास्थळी गेले.येरळा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अशोक सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाण्यातून वाहून गेले. स्थानिक नागरिकांनी शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह शिरतोडे शेताजवळ येरळा नदीपात्रातील झुडपात अडकलेल्या अवस्थेत सापडला. पत्नीच्या डोळ्यादेखत पती पाण्यातून वाहून गेल्याने पत्नी सुवर्णा यांच्यासह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नीच्या डोळ्यादेखत पती गेला वाहून, भाळवणीतील नदीपात्रात घडली दुर्घटना
By श्रीनिवास नागे | Published: September 26, 2022 7:06 PM