लक्ष्मण सरगरआटपाडी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला सदस्य निवडून जाणार आहेत. या नवदुर्गांच्या हाती गावच्या विकासाचा रथ असणार आहे. शिवाय थेट ७ गावात महिलासरपंच होऊन ‘महिलाराज’ येणार आहे.आटपाडी तालुक्यामध्ये १७ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. एकूण १४७ सदस्य निवडले जाणार आहेत. यात महिला सदस्यांच्या राखीव ८३ जागा आहेत. तर थेट सरपंच म्हणून ७ जागांसाठी निवडणूक होत आहे. पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या जास्त आहे. फक्त आरक्षण म्हणून महिलांना पुढे उभा करून पतीच्या हातात सत्तेची दोरी न देता नवदुर्गांनी सत्तेची दोरी स्वत:च्या हाती घेऊन गावच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे.आटपाडी तालुक्यातील नेतेमंडळींनी महिलांनाच फक्त निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी प्रोत्साहन न देता त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी देण्याची गरज आहे. पतीराज संपुष्टात येण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. महिला सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. मात्र, राजकारणामध्ये त्यांच्या पदाचा वापर फक्त सही करण्यापुरताच केला जात असल्याचे दुर्दैवी सत्य नाकारता येत नाही.
सत्तासारी पाटात सहभाग..नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या विविध रूपांचा जागर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सत्तेच्या सारीपाटात सहभागी करून घेतले जात नाही. सात ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी महिला आरक्षण मिळाले आहे. या गावातील संभाव्य उमेदवार राजकीय घराण्यातीलच असणार आहेत. त्यांच्या पतीने मात्र आपल्या दुर्गेला एक वेगळी संधी म्हणून गावचा कारभार स्वतंत्र करण्यास देण्याची गरज आहे. अनेक सुशिक्षित युवतींनी निवडणुकीत सहभाग घेऊन विकासाच्या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
महिलेच्या हाती सत्तेची दोरी..तालुक्यातील महिला सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायत मुढेवाडी (अनुसूचित जाती), आंबेवाडी, करगणी, मिटकी, नेलकरंजी (नामाप्र महिला), खानजोडवाडी, काळेवाडी (सर्वसाधारण महिला) आरक्षण आहे. १७ गावांमध्ये एकूण मतदान ३५ हजार ९७३ असून, यामध्ये महिलांचे मतदान १७ हजार २४१ इतके आहे. एकूणच आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा निकाल हा महिलांच्या हाती आहे. आता महिलांनी विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.