सांगली : शहरासह जयसिंगपूर, शहापूर (जि. कोल्हापूर) परिसरात ‘मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. उत्तम राजाराम बारड (वय ३०, रा. धामोड ता. राधानगरी जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख ९६ हजार रुपयांच्या दागिन्यांसह दुचाकी असा चार लाख ५६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लांबविण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास करून चोरट्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, संशयित उत्तम हा शहरातील कुपवाड रस्त्यावरील भारत सुतगिरणी चौक परिसरात थांबला आहे. पथकाने तिथे जात त्याला पळून जाण्याची संधीही न देता त्यास ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत त्याने शहरातील खिलारे मंगल कार्यालयाजवळून दुचाकी चोरल्याची कबुली दिली तर खिशात असलेले दागिने हे शंभरफूटी रोड, खिलारे मंगल कार्यालय, मौजे डिग्रज, इचलकरंजी आणि जैनापूर (ता.शिरोळ) येथे ‘मॉर्निंग वाॅक’साठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, अमर नरळे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.