अविनाश कोळीसांगली : ढासळलेल्या सांगलीच्या बालेकिल्ल्यावरही राजेशाही थाटात काँग्रेस नेत्यांचा वावर सुरू आहे. काँग्रेसचे उरले-सुरले अवशेषही जमीनदोस्त करण्यासाठी भाजपने सुरुंग लावण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. तरीही रोमच्या राजाप्रमाणे काँग्रेस नेते स्वत:च्या विश्वात रममाण राहण्यात धन्यता मानत आहेत.महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असतानाच भाजपने त्यांची ताकद पणाला लावली आहे. सध्या महापालिका क्षेत्रावर त्यांचेच वर्चस्व आहे. तरीही तेवढ्याने समाधान न मानता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीला मुळासहित उखडून काढण्यासाठी ते सरसावले आहेत. सध्या काँग्रेसविरोधात त्यांचा आराखडा तयार आहे. ताकदीच्या काँग्रेस नगरसेवकांना भाजपमध्ये खेचण्याची तयारी त्यांनी केली आहे.
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यात बऱ्यापैकी यशही त्यांना मिळाले आहे. हे सारे घडत असताना काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांचा हा गाफीलपणा त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.काँग्रेस नगरसेवक मनोज सरगर यांच्या निवासस्थानी भाजपच्या आमदारांनी दिलेली भेट म्हणजे पुढील महापालिका निवडणुकीसाठीच केलेली पेरणी आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह अन्य काही नगरसेवकांनी उघडपणे भाजपबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ही सारी लक्षणे दोन्ही काँग्रेससाठी चांगली नाहीत. तरीही राजकारणात प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांनी या संकेतांमधून कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसत आहे.
निवडणुकीपूर्वी होणार काँग्रेसची पडझड
महापालिकेत सध्या काँग्रेसचे २० नगरसेवक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असल्याने भाजपने प्रथम काँग्रेसला टार्गेट केले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसची मोठी पडझड होईल, यादृष्टीने भाजपची योजना आहे. तसे संकेतही मिळत आहेत.
मिरजेतील राष्ट्रवादीलाही धक्कामिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची तयारीही राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीलाही मोठा धक्का देण्याची तयारी केली जात आहे. मिरजेतील ज्येष्ठ माजी नगरसेवकावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
काँग्रेस पराभूत मानसिकतेतझालेल्या व भविष्यातील होणाऱ्या पराभवाची मानसिकता काँग्रेस नेत्यांनी केलेली दिसते. राजकारणातील औपचारिक वावर असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमध्ये संख्या अधिक आहे. सक्रिय पदाधिकारी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत.