सांगली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सद्दाम हुसेन शहा (वय ३२, रा. नेहरूनगर, कुपवाड) असे आरोपीचे नाव आहे. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे तक्रारदार व साक्षीदार फितूर असतानाही आरोपीस शिक्षा झाली.
खटल्याची माहिती अशी की, आरोपी पीडितेच्या घरी नेहमी जात असे. २०२० मध्ये एकदा ती घरी एकटीच असताना, आरोपी तिथे गेला व त्याने तिच्या इच्छेविरोधात तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. पुन्हा दीड महिन्याने तिच्यासोबत त्याने संबंध ठेवले. याबाबत तिने कोणाला सांगितले नव्हते. डिसेंबर २०२१ मध्ये ती गरोदर असल्याचे लक्षात येताच तिने ही बाब आईला सांगितली. तपासणीत ती गरोदर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यानंतर तिच्या आईने तिला कर्ण संस्थेत नेले व त्यानंतर आरोपी सद्दाम शहा याच्याविरोधात ९ डिसेंबर २०२१ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली.
यानंतर पीडितेची प्रसूती झाल्यानंतर अर्भकाचे डीएनए नमुने घेण्यात आले. शिवाय ती व आरोपी सद्दाम यांचेही नमुने घेण्यात आले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून त्यांची तपासणी केली. त्यात तिच्या अर्भकाचा जैविक पिता आरोपी असल्याचे सिद्ध झाले.
पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात १३ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील डॉक्टरांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या खटल्यात पोलिस कर्मचारी बाबासाहेब काटकर, गणेश वाघ, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले, सुनीता आवळे यांचे सहकार्य मिळाले.
‘त्या’ दोघी फितूर, तरीही शिक्षा
या खटल्यात पीडिता आणि तिची आई दोघीही फितूर झाल्या. त्यांनी आरोपी दोषमुक्त होण्यासाठी मदत केली. खटल्यातील दोन महत्त्वाचे तक्रारदार, साक्षीदार फितूर झाले असतानाही अन्य मार्गे आलेल्या पुराव्यांआधारे आरोपीला दोषी धरण्यात आले.