अविनाश कोळी, सांगली : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही भूसंपादनाचा अध्यादेश काढण्यात आल्याने सांगलीत गुरुवारी अध्यादेशाची होळी करण्यात आली. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
गुरुवारी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात महामार्गबाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याची सुरुवात सांगलीतून करण्यात आली. कष्टकर्यांची दौलत इमारतीसमोर शासनाच्या भूसंपादन अध्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. १८ जूनला कोल्हापूर येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रकांनी केले. २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन चालुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीस उमेश देशमुख, सतीश साखळकर, सुनिल पवार, उमेश एडके, राजेश एडके, विष्णू पाटील, डॉ. संजय पाटील, किरणराज कांबळे, यशवंत हरगुडे, राजेश एडके यांच्यासह सांगली जिल्ह्यातील बाधित१९ गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.