सांगली : महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी संताप व्यक्त करीत पुरोगामी पक्ष, संघटनांच्यावतीने शनिवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या प्रतिमेवर चपला ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांसमोर आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. ‘भाजप चले जाव’, ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’, ‘कोश्यारी चले जाव, आशा घोषणा देण्यात आल्या. महामानवांनी केलेल्या कामांचे फलक यावेळी झळकविण्यात आले.आंदोलनात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. संजय पाटील, नितीन गोंधळे, किरणराज कांबळे, शेखर माने, अॅड. के. डी. शिंदे, अजित सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी, महादेव साळुंखे आदी सहभागी झाले होते.२२ डिसेंबरला ‘सांगली बंद’ची हाकमहामानवांचा अवमान केल्याप्रकरणी येत्या २२ डिसेंबर रोजी ‘सांगली बंद’ची हाक यावेळी आंदोलकांनी दिली. या दिवशी सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय, उद्योग बंद ठेवावेत, सर्व पुरोगामी पक्ष संघटनांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.बदनामीमागे भाजपछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील ही सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भाजपच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे. त्यांना धडा शिकवायला हवा, असे के. डी. शिंदे म्हणाले.
भाजप नेत्यांच्या प्रतिमेवर ठेवल्या चपला, महापुरुषांच्या अवमानप्रकरणी निदर्शने; २२ डिसेंबरला ‘सांगली बंद’ची हाक
By अविनाश कोळी | Published: December 17, 2022 2:38 PM