लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील एसटी आगारातून वेळेत व पुरेशा गाड्या सोडल्या जात नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. स्थानकाच्या प्रवेशद्वारातच विद्यार्थी अभ्यासाला बसले. एसटीची वाहतूक रोखून धरली.
विद्यार्थी परिषदेचे स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तालुकाभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिराळा, इस्लामपूर येथे जावे लागते. त्यासाठी एसटीतूनच प्रवासाचा पर्याय आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटीचे वेळापत्रक ढासळले आहे. सकाळी लवकर येण्यासाठी किंवा रात्री उशिरा घरी परतण्यासाठी बसेस नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. अनेकदा रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनी स्थानकातच अडकून पडतात.
प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे वेळेत बस मिळत नाहीत. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही गाड्या सोडलेल्या नाहीत. याच्या निषेधार्थ शनिवारी विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले. स्थानकाच्या प्रवेशदारातच अभ्यास सुरु केला. तालुकाभरातून
विद्यार्थी-विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाले. ठोस आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांनी गरजेनुसार विविध मार्गांवर पुरेशा फेऱ्या सुरु करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे एसटीचे वेळापत्रक काहीकाळ विस्कळीत झाले होते.