सांगली : तासगाव येथे द्राक्ष व्यापाऱ्याकडील तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची लुट करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारूती पाटील (३२) आणि अजित राजेंद्र पाटील (२२, सर्व रा. मतकुणकी ता.तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.याप्रकरणी महेश शितलदार केवलाणी (रा. पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अवघ्या काही तासात पोलिसांनी लुटीचा छडा लावल्याने कामगिरीचे कौतुक होत आहे.मंगळवारी सायंकाळी सव्वा सात ते साडे सातच्या सुमारास तासगाव येथील गणेश कॉलनी परिसरात हा प्रकार घडला होता. द्राक्ष व्यापारी असलेले महेश केवलाणी हे तासगाव तालुक्यातील द्राक्षे खरेदी करतात. मंगळवारी त्यांनी सांगलीतून एक कोटी १० लाख रुपयांची रोकड घेऊन ते तासगावमध्ये आले होते. याचवेळी संशयितांनी दुचाकी आडवी मारून केवलाणी यांची मोटार अडविली त्यांना तलवारीचा धाक दाखवून, दिवाणजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पैशाची बॅग घेऊन ते पसार झाले होते.सायंकाळच्यावेळी इतकी मोठी रक्कम लुटण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एलसीबीच्या पथकाकडून तपास सुरू असताना, ही लुट मतकुणकी येथील नितीन यलमार याने केल्याची व तो साथीदारांसह मणेराजूरी येथील शिकोबा डोंगराजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे छापा मारून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना हत्यारासह ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ एक कोटी ९ लाख रुपयांची रोकड, तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि तलवार असा माल जप्त करण्यात आला.वरीष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सागर टिंगरे, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप पाटील, विक्रम खोत, दीपक गठ्ठे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.आठ तासात छडाघटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी तपासात लक्ष घातले होते. यानंतर एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासातच या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
दुचाकीही चोरीचीगुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी किल्ले मच्छिद्रगड येथून संशयितांनी चोरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.