सांगली : येथील कंत्राटदार माणिकराव पाटील यांच्या खूनप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी तुंग (ता. मिरज) परिसरातील पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे. दोघांकडील माहिती व त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज यातून गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.मूळचे गोटखिंडी (ता. वाळवा) येथील मात्र सध्या सांगलीत वास्तव्यास असणारे कंत्राटदार माणिकराव पाटील यांचे शनिवारी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर कवठेपिरानजवळ वारणा नदीत त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावरून त्यांचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली.या प्रकरणाच्या तपासाला आता दिशा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तुंग येथील पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे. दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. या दाम्पत्याच्या घराचे काम सुरू असून, ते काम पाटील यांच्याकडे होते. त्यामुळे या दोघांकडील माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.मिळालेेल्या माहितीनुसार, तुंग येथेच पाटील यांना मारहाण करण्यात आली होती. मात्र, हा परिसर वर्दळीचा असल्याने त्यांना त्यांच्याच मोटारीतून कुंभोज (जि. कोल्हापूर) येथे नेत पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली व जखमी अवस्थेतच वारणा नदीत टाकण्यात आले.पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, एलसीबीचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या खुनाचा उलगडा लवकरच होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
तुंगमध्ये मारहाण, गळा आवळण्याचा प्रयत्नशनिवारी पाटील यांना संशयिताने कॉल करून तुंग येथे बोलावून घेतल्यानंतर तिथेच त्यांचा गळा आवळण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर त्यांना दुसरीकडे नेत मारहाण करण्यात आली. तुंग येथून त्यांच्याच मोटारीतून त्यांना नेण्यात येत असताना, एक दुचाकी मोटारीसोबत असल्याची माहिती मिळाली.