राहुल गांधींच्या उपस्थितीत ‘मविआ’ फुंकणार रणशिंग, कडेगाव येथे ५ सप्टेंबरला महामेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 06:13 AM2024-08-23T06:13:07+5:302024-08-23T06:15:01+5:30
या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
सांगली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ५ सप्टेंबरला कडेगाव येथे महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यावेळी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी हा मेळावा घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना डॉ. विश्वजित कदम यांनी निमंत्रण दिले आहे. बहुतांशी नेत्यांनी येण्याची तयारी दर्शविली आहे.
कडेगावमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीची सांगता मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा होणार आहे.
महाविकास आघाडीचा एकसंधपणा दिसणार
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना यांची एकजूट मेळाव्याच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.