सांगली : राज्यात सध्या पेपर परीक्षा घोटाळे सुरु आहे. राज्यात सुरु असलेल्या घोटाळ्यांचे धागेदोरे थेट सांगली जिल्ह्यात देखील सापडले आहेत. यामुळे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील १५८ शिक्षकांची दि. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती झाली आहे. या सर्व शिक्षकांच्या टीईटी गुणांच्या पडताळणीसाठी प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेकडे जिल्हा परिषदेने पाठविले आहेत.टीईटी परीक्षा दिलेल्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र सादर करून, शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. या निर्णयानुसार दि. १३ फेब्रुवारी २०१३नंतर नियुक्त झालेल्या व इयत्ता आठवीपर्यंत अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे टीईटी प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करायचे आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून टीईटी प्रमाणपत्रांवर नियुक्त झालेल्या शिक्षकांची प्रमाणपत्र मागवून घेतली आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीमध्ये शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटीचा पेपर एक होता. या पेपरत उत्तीर्ण झालेले ५७ शिक्षक आहेत. तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी टीईटीचा पेपर दोन उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. या पेपरला १०१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सध्या शिक्षक म्हणून जिल्ह्यात काम करत आहेत.
टीईटी पेपर एक आणि टीईटी पेपर दोनचे एकत्रित उत्तीर्ण १५८ शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या प्रमाणपत्रात बोगसगिरी असण्याची शक्यता आहे. या संबंधीची माहिती चौकशीतून पुढे आल्यामुळे १५८ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.टीईटीचे बोगस प्रमाणपत्र दिले की शिक्षकांची फसवणूक झाली?टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळवल्या आहेत का? किंवा बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षकांची फसवणूक झाली आहे का? याची माहिती चौकशीनंतरच पुढे येणार आहे. यामुळे टीईटी घोटाळ्यात सहभागी शिक्षकांनी चौकशीचा चांगलाच धसका घेतला आहे.